Sunday, May 9, 2010

ने मजसी ने

‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ जणू काही ते त्यांचा सगळा भावनिक आघात सागरावर करीत आहेत – त्या सागरावर रागावलेला – रूसलेला हा मातृभूमीचा प्रियपुत्र म्हणतो – ‘सागरा, तू खरं तर माझा भूमातेचे पाय धुणारा सेवक आहेस.
भूमातेच्या चरणतला तुज धूता ।
मी नित्य पाहिला होता


त्यावेळेला मी तिथे असताना तू मला मैत्रीने म्हणालास – मित्र मित्राला म्हणतो तसा – की चल जरा फिरायला जाऊ
दुस-या देशात-
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ ।
सृष्टीची विविधता पाहू


त्याच वेळेला माझ्या आईच्या ह्रदयात माझा तिला विरह होईल की काय अशी शंका आली.
तअ जननी-ह्रद विरहशंकितहि झाले ।
परि तुवां वचन तिज दिधले


पण तू तिला वचन दिलंस, की मी मार्गज्ञ म्हणजे वाट माहित असणारा आहे, आणि मी याला अगदी पाठीवरून घेऊन जाईन – जहाज सागराच्या पृष्ठावरून म्हणजे पाठीवरूनच नेलं जातं. त्यानुसार
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन।
त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी


तुझ्या वचनावर विश्वास ठेवला. तू जगभर सगळीकडे आहेस त्यामुळे जगाचा तुला अनुभव असाणार हा विश्वास आणि मलाही जगाचा सुंदर अनुभव यावा ही इच्छा या दोन्हीच्या योगे मी ‘बनलो’ तयार झालो आणि ‘बनलो’ म्हणजे फसलो.
तव अधिक शक्त उदधरणी । मी

पाणी कोणत्याही वस्तुला उत् म्हणजे वर धारण करतं वर ढकलंत त्याला उदधरण (buoyancy) म्हणतात. त्यामुळे वस्तूचं वजन पाण्यात कमी वाटतं. हा उदधरण. शक्तिचा शास्त्रीय अर्थ आणि ‘उद् धार करणे’ याचा प्रचलित अर्थ दोन्हींनी – तुझ्या उद् धरण शक्तीवर जास्त विश्वासलो. इथं अडकवून चांगला उद् धार केलास बरं !
‘येईन त्वरे’ कथुन सोडिले तिजला ।
सागरा प्राण तळमळला ।।१।।


लवकर येईन असं सांगून तिला सोडलं. (भारताचा किनारा सोडला) पण आता ते जमेल की नाही कुणास ठाऊक म्हणून प्राण तळमळतो आहे.
शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ।
ही फसगत झाली तैशी


पोपट पिंज-यात किंवा हरिण पारध्याच्या पाशात सापडावा तसा फसलो.
भू विरह कसा सतत साहू या पुढती ।
दशदिशा तमोमय होती


तमोमय म्हणजे अंधःकारमय – मार्ग दिसत नाही असं झालंय.
गुणसुमने मी वेचियली या भावे ।
की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद् धरणी व्यय न तिच्या हो साचा ।
हा व्यर्थ भार विद्येचा

मला काय आठवतं ? तर माझ्या देशातल्या आम्रवृक्षांची वत्सलता, त्या फुललेल्या सुदंर वेली आणि तिथला छोटा पण सुगंधी गुलाब. (इकडच्या मोठया गुलाबांना तो सुगंध नाही आणि इकडच्या माणसांना आमच्या कुटुंबातल्या माणसांप्रमाणे घरात ती आम्रवृक्षासारखी वत्सलता ही नाही. त्यांच्यावर पुढची पिढी नवलतांसारखी वाढते आणि तिच्या पुढच्या पिढीची फुलंही त्या वृक्षवेलींवर नांदतात. ही सुंदर कुटुंब वत्सलता – प्रेम इथे नाही.
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला ।
सागरा प्राण तळमळला ।। २ ।।
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा ।
मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी ।
आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा ।
वनवास तिच्या जरि वनिंचा


राज्य तर नकोच आहे पण वनवास सुध्दा तिच्याच वनातला हवा आहे. तुरूंगात घातलं तरी भारतातल्या तुरूंगात यांनी घालावं पण एखादे वेळेस हे इथेच कुठेतरी डांबून ठेवतील, ते नको आहे.
भुलविणे व्यर्थ हे आता । रे
बहु जिवलग गमते चित्ता । रे
तुज सरित्पते, जी सरिता । रे


हे सरित्पते, म्हणजे सरितांचा पती – इथलं काव्य पाहण्यासारखं आहे. सरिता (नद्या) सागराला स्वतःचं सगळं समर्पित करतात. तो त्यांचा पती. सरितेला सागराची ओढ असते तशीच सागरालाही सरितेची ओढ असते. सागराला म्हणत आहेत –माझं जिच्यावर प्रेम आहे त्या भारतामातेचा मला विरह घडवशील तर हे सागरा तुझं ज्यांच्यावर प्रेम आहे त्या सरितांचा तुला विरह होईल अशी मी तुला शपथ घालतो. नद्या तुझ्याकडे आल्याच नाहीत तर – मग प्राण तळमळणं म्हणजे काय असतं हे तुलाही कळेल.
तद्विरहाची शपथ घालितो तुजला ।
सागरा, प्राण तळमळला ।। ३ ।।

यानंतर आता शेवटचं कडवं आहे त्यात सावरकरांची आर्त आहे ; पण ती दीनवाणी नाही तर ती आक्रमक आर्त आहे. एखादा संकटात सापडलेला गलितगात्र सुटकेची भीक मागतो तसं हे मागणं नसून अवघड परिस्थितीतल्या सिंहाची डरकाळी आहे. सागराला सरितांच्या विरहाची शपथ घालून झाल्यावर ते सागराकडे पाहत आहेत तर त्याच्या लाटा तशाच उसळून फुटून फेसाळत आहेत. तो फेस पाहून त्या प्रकारे तो निर्दय सागर हसतो आहे असं त्यांना वाटलं. वीर पुरूषाने आव्हान दिल्यावर खलपुरूष असेच हसतात. असं वाटून ते म्हणतात-
या फेन-मिषे हससि निर्दया कैसा ।
का वचन भंगिसी ऐसा ?


माझ्या भारतमातेला तू जे वचन दिलं होतंस, की मी याला परत आणीन, ते भंग करून असा हसतोयस कसा ? हे गुलाम असतात ना, ते ज्यावेळेला मालकाच्या ताब्यात असतात तेव्हा आपण सुरक्षित आहोत म्हणून जगाकडे पाहून ते हसतात; पण ते गुलामीवृत्तीचं हीन प्रदर्शन असतं. तुझं हसणं हे असंच आहे. तुझ्यावर स्वामित्व गाजवणा-या आंग्लभूमीचा तू खरं तर गुलाम. तिला भिऊन राहणा-या सागरा,
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते ।
भिउनि का आंग्लभूमी ते ?
मन्मातेला अबल म्हणुनि फसविसी ।
मज विवासना ते देशी

विजनवास विदेशवास किंवा विवास – तू मला देतो आहेस पण अरे, आंग्लभूमीला भिणा-या भित्र्या खलपुरूषा, ऐक –
तरि आंम्लभूमी भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे


माझी भारतभूमी ही अबला नाही आहे हे तुला एक दिवस कळेल. पूर्वीचा अगस्ति ऋषीचा प्रसंग तू विसरला आहेस.
कथिल हे अगस्तिस आता । रे

आमच्यातला एक अगस्ति पू्र्वी तुझ्यावर क्रुध्द होऊन एकाच आचमनात तुझं सगळं पाणी पिऊन बसला. तुझी कुठे नाव निशाणीही राहिली नाही. सर्वांनी प्रार्थना केली म्हणून त्याने तुला सोडलं. एवढा रूबाब काय करतोयस गुलामा, अगस्तीचा वारसा लाभलेले आम्ही तुला पुन्हा धडा शिकवू.

मातृभूमीला दुरावलेला आणि कायमचा दुरावला जाईल अशी शक्यता असलेला एक वीर पुरूष सागरावर रूसलेला आहे. वेदनेतून निर्माण झालेल्या ह्या अप्रतिम काव्यातून महापुरूषाचं मातृभूमीवरचं प्रेम आणि तिच्या भेटी आड येणा-या सागरावरचा रोष प्रकट झालाय. युवा केंद्राचं आगळेपण हे आहे की सागरावरचं हे तुफानी काव्य गात आहे सागरच !

स्वामी माधवानंद

सौजन्य -http://www.savarkar.org/

Wednesday, January 13, 2010

सिंधू नदी मुक्‍त करण्याचे ध्येय!

बरोबर १०० वर्षांपूर्वी पंचविशीतील सावरकर स्वातंत्र्यप्राप्‍तीच्या ऐतिहासिक कार्यात लंडनमध्येच गढून गेले होते. ब्रिटिशांनी काढून घेतलेले शस्त्र मिळवून ते त्यांनी भारतीय तरुणांच्या हातात दिले, जे तरुण स्वतंत्र भारताची उत्तम प्रकारे सेवा करू शकतील त्यांना हुडकून भारतनिष्ठ आणि सक्षम बनवण्याचे काम त्यांनी केले आणि संधी मिळताच ब्रिटनविरुद्ध युद्ध छेडण्याच्या दृष्टीने सशस्त्र क्रांतीकारकांचे आंतरराष्ट्रीय संधान त्यांनी बांधले. हे त्यांनी कसे साधले याचा अभ्यास केला, तर आजच्या युवकांना निराशा शिवणारदेखील नाही. संक्षेपाने सांगायचे तर सावरकरांनी मराठी तरुणांना नित्य म्हणावयाच्या आपल्या स्नानमंत्रातील पाकिस्तानात ढकलण्यात आलेली सिंधू नदी मुक्‍त करण्याचे ध्येय दिले आहे. ते ध्येय व्यवहारात उतरवणे शक्य व्हावे म्हणून त्यांनी सैन्यात शिरण्याचा कार्यक्रम दिला आहे. आपल्या सेनादलात अधिकार्‍यांची १२,००० पदे रिक्‍त आहेत. तरुणांना आपण सैनिक व्हावे, असे वाटत नाही; म्हणून ही पदे भरली गेली नाहीत. `महाराष्ट्र भारताचा खड्गहस्त' असे सावरकर म्हणाले होते. त्याला जागून मराठी तरुण सैन्यात शिरले, तर महाराष्ट्राचेच काय अवघ्या भारताचे नवनिर्माण ते करू शकतील !

Monday, January 11, 2010

हुतात्म्यांनो !!!!!!!

१९०७ साली लंडन येथे १८५७ साली झालेल्या स्वातंत्र्य संग्रामाला ५० वर्षे झालेली होती. या सुवर्णमहोत्सवी दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १८५७ च्या हुतात्म्यांना उद्देशुन वक्तव्य केल होतं. सावरकरांनी केलेल वक्तव्य मुंबईच्या सावरकर सदन येथे आजही लिहिलेल आढळते.

"भारताच्या रणांगणावर तुम्ही स्वातंत्र्य संग्रामातील पहिली मोहिम सुरु केलीत ती १८५७ या नित्यस्मरणीय वर्षी! जो सतत फडकत राहवा असा ध्वज तुम्ही या दिवशी उभारलात; ज्यांच्या पुर्तीत धन्यता वाटावी अशा ध्येयाचा उच्चार तुम्ही या दिवशी केलात, जे स्वप्न सत्यसृष्टीत उतरण्यात धन्यता वाटावी असे स्वप्नही तुम्ही या दिवशी पाहिलेत, राष्ट्र म्हणुन आपण अवतीर्ण होत आहोत हे सत्य तुम्ही या दिवशी उदघोषित केलेत. तुम्ही केलेल्या घोषणांचा स्वीकार करतो. क्रांतीयुद्धाच्या धुमश्चक्रीत तुम्ही 'मारो फिरंगी को' हे प्रेषिताला शोभेल असे शब्द उच्चारुन जे दाहक कार्य निश्चित केलेत ते पुढे चालवण्याचा निर्धार आहे. फांसावर जाताना आपण एखाद्या भविष्यवाद्याला शोभेल असे शब्द उच्चारलेत -: 'तुम्ही आज मला फासावर लटकवु शकाल, पण कदाचित माझ्यासारख्यांना तुम्ही प्रत्यही देखील फासावर चढवु शकाल पण माझी जागा भरुन काढण्यासाठी सहस्त्रावधी लोक पुढे सरसावती, तुमचा हेतु कधीच सफल होणार नाही.' हुतात्म्यांनो! तुमच्या रक्ताचा बदला घेतला जाईल."

Tuesday, January 5, 2010

देशभक्‍त डॉ. नारायण दामोदर सावरकर !


त्रिवर्ग सावरकर क्रांतीकारक बंधूंमध्ये डॉ. नारायणराव सावरकर हे धाकटे. बुद्धीमत्ता, प्रतिभा, उत्कट देशभक्‍ती आणि कर्तृत्व यांमध्ये मात्र ते वडील बंधूंहून थोडेही उणे नव्हते. एकाच ध्येयाने प्रेरित असे हे तिघे बंधू सशस्त्र क्रांतीच्या एकाच मार्गाने `अभिनव भारत' संघटनेत आणि पुढे `हिंदुमहासभा' या एकाच राजकीय पक्षात कार्य करीत राहिले.

विद्यार्थीदशेपासूनच क्रांतीचे विचार !

देशभक्‍त नारायणरावांचा जन्म २५ मे १८८८ रोजी झाला. सावरकरांचे घराणे मुळात श्रीमान; परंतु एकावर एक आकस्मिकपणे कोसळत गेलेली संकट परंपरा आणि आपत्ती यांच्यामुळे नारायणरावांचे बालपण कष्टमय परिस्थितीत गेले. आई-वडिलांचे छत्र दैवाने लवकर हिरावून घेतल्यामुळे त्यांचे लालनपालन मोठे बंधू गणेशपंत तथा बाबाराव आणि त्यांची पत्‍नी सौ. येसूवहिनी यांनी केले. विख्यात लेखक आणि चरित्रकार द.न. गोखले `क्रांतीवीर बाबाराव सावरकर' या चरित्रग्रंथात म्हणतात, `नारायणराव अर्भक असतांना मातेच्या ममतेने आणि पित्याच्या प्रेमळपणाने बाबांनी त्यांचे संगोपन केले. आपल्या तात्याप्रमाणे आपला बाळही देशभक्‍त व्हावा, म्हणून ते नारायणरावांचे शिक्षण मोठ्या आशेने करत. त्यांची ती आशा नारायणरावांनी इंग्रजी तिसरीत गेल्यापासूनच पुरी करण्यास प्रारंभ केला. बाबा-तात्यांपासून त्यांनी जी स्फूर्ती घेतली तिच्या बळावर त्यांनी `मित्रसमाज' या विद्यार्थी संघटनेचा व्याप उभा केला आणि तो समर्थपणे सांभाळून क्रांतीकक्षेत कितीतरी तरुण आणून सोडले. आपल्या स्फूर्तीप्रद वक्‍तृत्वावर ते विद्यार्थीदशेपासून तरुणांना मोहवत आणि थोरांकडून वाहवा मिळवत. मॅट्रिकनंतर १९०८ मध्ये ते उच्च शिक्षणासाठी बडोद्याला गेले आणि तेथे त्यांनी `अभिनव भारता'ची शाखा स्थापली. या शाखेत अजमासे दोनशे तरुण प्रतिज्ञित झाले होते. बडोद्याचे संघटनकार्य `मित्रसमाजा'प्रमाणेच नारायणरावांनी नावारूपाला आणले. त्याच वेळी अभ्यास सांभाळून माणिकरावांच्या व्यायामशाळेत कुस्ती, मल्लखांब, लाठी इत्यादींचे त्यांनी उत्तम शिक्षण घेतले. नारायणराव सुटीत नाशिकमध्ये आले की, तेथल्या मुलांशी या विद्येची देव-घेव चाले. नाशिकमधल्या उद्योगात सैनिक संचलन, नेमबाजी नि भिंतीवर चढण्याची कला यांचाही समावेश होता. हा `मित्रसमाज' म्हणजेच अन्यत्र उल्लेखलेला `मित्रमेळा'. मित्रमेळयाच्या साप्‍ताहिक सभा होत नि त्यात देशाविषयी वेगवेगळया पुस्तकांद्वारे चर्चा चाले. स्फूर्तीप्रद विचार मांडले जात.

सहा महिन्यांची शिक्षा !

१८९९ ते १९०८-९ पर्यंत नाशिकमध्ये क्रांतीकार्य जोरात चालू होते. या क्रांतीकार्याच्या परिणामी वयाच्या केवळ अठराव्या वर्षीच इतिहासप्रसिद्ध `नाशिक कट' अभियोगात नारायणरावांना सहा महिन्यांची शिक्षा झाली. (बाबारावांना जन्मठेपेची शिक्षा झाली २१ नोव्हेंबर १९०९ या दिवशी. त्याआधीच कर्णावतीला झालेल्या ध्वमस्फोटांच्या संबंधात नारायणरावही पकडले गेले. लंडनमध्ये असलेल्या विनायकरावांवर ब्रिटीश शासनाची वक्रदृष्टी होतीच.) आरक्षींनी (पोलिसांनी) केलेली मारहाण सहन करून, शेवटी पुराव्याअभावी ते त्यातून निर्दोष बाहेर पडले. १८ डिसेंबर १९०९ ला ते घरी येऊन टेकतात, तोच २१ डिसेंबरला नाशिकलाच अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनचा वध केला. त्याच रात्री नारायणराव पकडले गेले नि पुन्हा छळयातनांच्या चक्रात सापडले.
२१ जून १९११ ला सुटल्यानंतर त्यांना कोठल्याही महाविद्यालयात प्रवेश मिळेना. शेवटी कोलकात्याच्या `नॅशनल मेडिकल महाविद्यालयात' प्रवेश मिळाला. आर्थिक चणचण, शासकीय गुप्‍त आरक्षींचा ससेमिरा, पुन:पुन्हा होणार्‍या चौकशा यांना तोंड देत, १९१६ मध्ये नारायणराव `अँलोपथी' आणि `होमिओपथी' या दोन्हींचे पदवीधर झाले. `दंतचिकित्सा' या विषयातही त्यांनी पदवी घेतली. त्या दिवसांत शिक्षणव्यय भागवण्यासाठी त्यांनी अधूनमधून व्यापारी पेढ्यांवर कारकुनाचे कामही केले. विद्यार्थीदशेत त्यांना मॅडम कामा यांनी फ्रान्समधून पाठवलेल्या अर्थसाहाय्याचे मोलच करता येणार नाही !
कोलकात्यामधील त्या दिवसांतच नारायणराव आणि डॉ. हेडगेवार यांची मैत्री झाली. त्या दिवसांतली एक गोष्ट सांगण्याजोगी आहे.
तिघाचौघा मित्रांचा एक गट झाला होता. आर्थिक अडचण तर नेहमीचीच. खानावळीतून दोन व्यक्‍तींचा डबा मागवायचा आणि तो चौघांनी वाटून खायचा, असे चाले. अर्थातच तो अपुरा पडे. `तुम्ही पाठवता तो डबा पुरत नाही' असे खानावळवाल्याजवळ एकदा गार्‍हाणे केल्यावर थोडी वादावादी झाली; पण तो म्हणाला, " तुमच्यापैकी एकाने एक दिवस इथे येऊन जेवावे. तो जेवढे खाईल तेवढे मी पाठवीन."
वसतीगृहावर आल्यावर विचारविनिमय झाला आणि डॉ. हेडगेवारांनी जेवण्यास जावे असे ठरले. हेडगेवार जेवायला गेले आणि त्यांनी बावीस-चोवीस पोळया खाल्ल्या ! खाणावळवाला पहात होता. त्याची दानत अशी की, त्याने शब्द पाळला. तो प्रतिदिन तेवढ्या पोळया पाठवू लागला आणि चौघांचे बर्‍यापैकी भागू लागले !
या प्रसंगाविषयी विख्यात लेखक पु.भा. भावे एका लेखात म्हणतात, " खादाडपणाची ही कहाणी हिंदुत्वाला अमृतवाणी ठरली. कारण त्या काळात खाल्लेला प्रत्येक घास हिंदुजातीचे आयुष्य वर्षावर्षाने तेज:पुंज व पराक्रमी करता झाला. पुढे १९४० सालापर्यंत ठिकठिकाणी घडणार्‍या मुसलमानी अत्याचारांना ठायीठायी हाणण्यात आले ते याच सावरकर-हेडगेवार मैत्रीमुळे !"

चार पदरी संसार !

वैद्यकीय पदवीग्रहणानंतर १९१६ मध्ये मुंबईतच वैद्यकीय व्यवसाय करण्याचे ठरवून डॉ. नारायणरावांनी औषधालय थाटले. या औषधालयाचे उद्घाटन करण्याची त्यांनी साहित्यसम्राट न.चिं. केळकर यांना विनंती केली. त्यांनीही ती आनंदाने स्वीकारली, कारण त्यांनाही डॉ. नारायणरावांच्या देशभक्‍तीचे कौतुक होते. यापूर्वी म्हणजे १९१५ साली सौ. येसूवहिनींच्या आग्रहामुळे त्यांनी विवाह केला होता. त्यामुळे मुंबईत औषधालयाबरोबरच घर घेऊन त्यांनी संसारही थाटला.
एकीकडे व्यवसाय, दुसरीकडे प्रपंच, तिसरीकडे गुप्‍तपणे क्रांतीकार्य व क्रांतीकारकांना साहाय्य आणि प्रत्यक्षपणे करता येईल तितके समाजकार्य अशी चौपदरी जीवनक्रमाची त्यांची घोडदौड चालू झाली.

लोकमान्य टिळकांचे अनुयायित्व !

लो. टिळकांच्या मुंबईतील सार्‍या कार्यक्रमांना यशस्वी करण्यासाठी झटणार्‍या अनुयायांत डॉ. नारायणराव पुढे असत. लो. टिळकांच्या दौर्‍यात ते अनेकदा त्यांच्याबरोबर असत. काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनांना ते नियमितपणे उपस्थित रहात. मुंबईतील सार्वजनिक कामांतील त्यांच्या नावलौकिकामुळे ते काही काळ मुंबई नगरपालिकेचे निर्वाचित सदस्य होते. प्रारंभीच्या काळात अन्य अनेक नेत्यांप्रमाणेच त्यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ब्रिटीशविरोधी सत्याग्रहात आणि विधायक कार्यक्रमांत भाग घेतला व शिक्षा भोगल्या. १९२५ नंतर रा.स्व. संघाच्या प्रसारात मन:पूर्वक साहाय्य केले आणि त्यानंतर १९३७ पासून हिंदुमहासभेच्या माध्यमातून त्यांनी कार्य केले. या सर्व काळात अखेरपर्यंत हिंदुस्थानच्या हितार्थ स्वातंत्र्यप्राप्‍तीसाठी आणि हिंदुहितासाठी कार्य हे सूत्र मात्र कधीही सुटले नाही. क्रांतीकार्याला त्यांचे गुप्‍तपणे साहाय्य असेच. स्वत:चे शिक्षण पूर्ण करून व्यवसाय आणि प्रपंच करतांनाच, प्रभावी वक्‍तृत्व, लेखन आणि विधायक सामाजिक कार्य यांद्वारे दोघा वडील बंधूंच्या कार्यास पूरक कार्य ते करत राहिले.

लेखनकार्य आणि समाजकार्य !

अब्दुल रशीदने स्वामी श्रद्धानंदांचा खून केल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ डॉ. ना.दा. सावरकरांनी `श्रद्धानंद' नावाचे साप्‍ताहिक चालू केले. `या साप्‍ताहिकातील लिखाणाचा व बुद्धीवादाचा माझ्यावर खोल ठसा उमटला', असे पु.भा. भावे यांनी म्हटले आहे. १० जानेवारी १९२७ ते १० मे १९३० पर्यंत ते `श्रद्धानंद'चे संपादक- संचालक होते.
लोकमान्यांच्या निधनानंतर गिरगांव चौपाटीवरील त्यांच्या दहनस्थानी कुठल्याही प्रकारे स्मारक उभारण्यास ब्रिटीश शासन अनुमती देत नव्हते. परंतु अनेक `टिळक भक्‍तांनी' त्या जागेचे पावित्र्य जपले. त्या जागेचा सांभाळ केला. पुढे १९३० मध्ये स्मारक उभे राहिले. त्या सर्व कामांत डॉ. नारायणरावांचा सहभाग होता. चौपाटीवर हिंदु धर्माची निंदा करून ख्रिस्ती धर्मप्रसार करणार्‍या एका मिशनर्‍याला डॉ. नारायणराव, डॉ. वेलकर आणि सुरतकर या तिघांनी असा धडा शिकवला की, त्याने पुन्हा तिथे पाय ठेवला नाही !
मुंबईत जागोजाग असणार्‍या पठाणांच्या जागी रक्षक म्हणून गुरखे आणणे हे डॉ. नारायणरावांनी केलेले आणखी एक कार्य. श्रद्धानंद महिलाश्रमाच्या प्रमुख संस्थापकांपैकीही ते एक होते. या आश्रम उभारणीसाठी आणि नंतर त्याच्या प्रत्यक्ष कार्यातही त्यांनी मन:पूर्वक कष्ट घेतले. गोव्यातील गावडे लोकांच्या शुद्धीकरणाची जी प्रचंड चळवळ विनायक महाराज मसूरकर यांनी सुरू केली, त्या कार्याला डॉ. नारायणरावांचे सर्व प्रकारे साहाय्य होते. १९२५, १९३७, १९३९ या वर्षी मुंबईत झालेल्या हिंदु-मुस्लिम दंग्यांत प्रत्याघात करणार्‍या हिंदूंच्या सुरक्षिततेची काळजी त्यांनी वाहिली !

विशेष साहित्यसेवा !

३० एप्रिल १९३० ला नारायणरावांना झालेल्या कारावासामुळे `श्रद्धानंद' साप्‍ताहिक बंद पडले. राजकीय कार्याच्या धकाधकीतही त्यांनी साहित्यसेवा केली. `वसंत' या टोपणनावाने लिहिलेले काव्य, १८५७ च्या समराच्या पार्श्‍वभूमीवर लिहिलेली `मरण कि लग्न' ही कादंबरी, `जातिहृदय' या नावाखाली लिहिलेली `समाजरहस्य' ही कादंबरी, `जाईचा मंडप' कादंबरी; सेनापती टोपे यांचे चरित्र, `हिंदूंचा विश्‍वविजयी इतिहास' इत्यादी त्यांचे साहित्य गाजले. स्वा. सावरकरांच्या `हिंदुत्व' आणि `हिंदुपदपादशाही' या महत्त्वाच्या इंग्रजी ग्रंथांचे मराठी अनुवादही त्यांनी केले.
३० जानेवारी १९४८ ला गांधीवध झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी त्यांच्या रहात्या घरावर गुंडांनी दगडफेक आणि हल्ला करून आजारी असलेल्या डॉ. नारायणरावांना भयंकर जखमी केले. ते बेशुद्ध झाले. तितक्यात आरक्षी पोहोचल्याने त्यांचे प्राण वाचले; परंतु त्यांना के.ई.एम्. रुग्णालयात भरती करावे लागले. त्यांना अटक करण्याची शासकीय आज्ञा असल्याने तेथे त्यांच्यावर पोलीस पहारा होता. यातून डॉ. नारायणराव वाचले खरे, पण यामुळे खालावलेली त्यांची प्रकृती पूर्वपदावर आलीच नाही. ऑक्टोबर १९४९ च्या पहिल्या आठवड्यात पुणे येथील `दै. प्रभात'साठी `हिंदूंचा विश्‍वविजयी इतिहास' या लोकप्रिय झालेल्या लेखमालेतील लेख लिहित असतांनाच डॉ. नारायणरावांना अर्धांगवायूचा झटका आला व ते बेशुद्ध पडले. १९ ऑक्टोबर १९४९ ला त्यातच त्यांचे दु:खद निधन झाले.
आपल्या दोन्ही बंधूंप्रमाणेच देशसेवेत अग्रेसर राहून डॉ. नारायणराव सावरकर यांनीही `सावरकर' कुलाचे नाव उज्ज्वल केले !

Monday, January 4, 2010

क्रांतीवीर बाबाराव सावरकर !



स्वा. सावरकरांना घडवणारे शिल्पकार

क्रांतीवीर गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर हे स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू. त्यांनीच स्वा. सावरकरांना पितृतुल्य प्रेम देऊन, अत्यंत हालअपेष्टा सोसून लहानाचे मोठे केले आणि त्यांच्या बरोबरीने क्रांतीकार्यातही भाग घेतला.

बाबारावांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी १३ जून १८७९ रोजी झाला. लहानपणी त्यांची प्रकृती नाजूक होती. सहाव्या वर्षापासून चौदाव्या वर्षापर्यंत त्यांना सुमारे दोनशे वेळा विंचूदंश झाले. पुढील क्रांतीकारी आयुष्यात यातना सहन करण्याची शक्‍ती यावी, अशीच ही निसर्गाची योजना असावी. तरुण वयातही त्यांनी स्वत:च्या शरीरास मुद्दामहून खूप कष्ट दिले. कडक थंडीतदेखील ते उघड्या अंगाने, पांघरूण न घेता घराबाहेर झोपत. त्यांच्या डोक्यात क्रांतीचेच विचार सतत घोळत असत. बलाढ्य ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध क्रांती करणे हे एकट्यादुकट्याचे काम नाही, तर त्यासाठी प्रबळ आणि कट्टर संघटना आवश्यक आहे, हे बाबारावांनी लहान वयातच हेरले. यासाठी `मित्रमेळा' या संघटनेची स्थापना करण्यात आली. राष्ट्रगुरु रामदासस्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, नाना फडणवीस आदी थोर पुरुषांच्या जयंत्या जाहीर सभा घेऊन साजर्‍या करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे तरुणांत आणि जनतेत देशभक्‍ती जागृत होण्यास खूपच मदत झाली. या निमित्ताने लोकमान्य टिळक, `काळ' या वर्तमानपत्राचे संपादक शिवराम महादेव परांजपे यांची देशभक्‍तीने रसरसलेली भाषणे नाशिककरांना ऐकण्याची संधी प्राप्‍त झाली.

वन्दे मातरम् अभियोग !

बाबारावांचा (`साहेब' हा शब्द फारसी. त्यामुळे साहेब ऐवजी `राव' हा शब्द सावरकरबंधूंनी रूढ केला. जसे बाबाराव, तात्याराव) ब्रिटीश शासनाशी पहिला संघर्ष १९०६ साली उडाला. नाशिकमध्ये जाहीर सभा घेण्यास असलेली बंदी मोडली, या गुन्ह्यासाठी त्यांना अटक करण्यात आली आणि १० रुपये दंड करण्यात आला. बाबारावांनी याविरुद्ध वरिष्ठ न्यायालयाकडे दाद मागितली आणि त्यांचा दंड रद्द झाला. २७ सप्टेंबर १९०६ रोजी दसर्‍यानिमित्त नाशिक येथील कालिकेच्या मंदिराकडून सीमोल्लंघन करून परतणार्‍या तरुणांनी `वन्दे मातरम्'चा जयघोष केला. तो ऐकून एका पोलिसाने `बोंब मारणे बंद करा', असे म्हणत बाबांच्या अंगावर हात टाकला. मात्र त्या पोलिसावरच पश्चात्तापाची पाळी आली. बाबांसकट सर्वांनीच त्या पोलिसाला ठोकून काढले ! या प्रसंगाने संतप्‍त झालेल्या ब्रिटीश सरकारने ११ तरुणांवर अभियोग भरला. `वन्दे मातरम् अभियोग' या नावाने तो गाजला. यात बाबाराव मुख्य आरोपी होते. नाशिक जिल्ह्यात हा अभियोग निरनिराळया ठिकाणी सहा महिने चालला; कारण न्यायाधीश फिरतीवर असत आणि ते असतील तेथे हा अभियोग चालत असे. या अभियोगात बाबारावांना २० रुपये दंड होऊन मोठ्या रकमेचा प्रतिभू (जामीन) मागण्यात आला. अन्य तरुणांनाही अशाच प्रकारच्या शिक्षा झाल्या. बाबाराव नाशिकमध्ये असतांना त्यांनी राष्ट्रहिताच्या दृष्टीने मूलभूत स्वरूपाच्या अनेक चळवळी सुरू केल्या. स्वदेशी चळवळ, विलायती मालावर बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षणाची सुरुवात इत्यादी चळवळींचे सूत्रसंचालन बाबाराव धुरिणत्वाने करत असत.

प्रकाशक बाबाराव !

याच सुमारास बाबारावांचे पाठचे बंधू स्वा. वि.दा. सावरकर लंडनमध्ये शिक्षण घेत होते. १९०६ साली स्वा. सावरकरांनी लिहिलेले प्रसिद्ध इटालियन क्रांतीकारक जोसेफ मॅझिनी यांच्या चरित्राचे हस्तलिखित बाबारावांकडे आले. ब्रिटिशांच्या दृष्टीने हे चरित्र अत्यंत स्फोटक होते. जून १९०७ मध्ये बाबारावांनी हे पुस्तक प्रसिद्ध केले. दोन महिन्यांतच २ सहदा प्रतींची पहिली आवृत्ती जवळ जवळ संपली. पुस्तकाच्या विषयाबरोबर बाबांचे परिश्रमही याला कारणीभूत होते. या पुस्तकाला स्वा. सावरकरांनी लिहिलेली २६ पृष्ठांची प्रस्तावना त्या वेळी अनेकांनी मुखोद्‌गत केली. यातील ज्वलंत विचारांनी प्रभावित होऊन अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन याचा वध केला. लवकरच स्वा. सावरकरांनी लिहिलेल्या आणि हॉलंडमध्ये मुद्रित केलेल्या `१८५७ चे स्वातंत्र्यसमर' या ग्रंथाच्या प्रती बाबारावांच्या हाती आल्या. बाबारावांनी या प्रतीही अत्यंत गुप्‍तपणे क्रांतीकारकांपर्यंत पोहोचवल्या. या अद्वितीय ग्रंथामुळे ब्रिटिशांविरुद्ध बंगाल, पंजाब आणि महाराष्ट्रात `गदर' पक्षाची स्थापना होऊ शकली ! `अभिनव भारत' संघटनेतील युवकांना आपण कोणत्या आगीशी खेळत आहोत, तसेच आपल्या कृत्यांना भारतीय दंडविधानात (इंडियन पिनल कोड) कोणत्या शिक्षा सांगितल्या आहेत, हे कळावे म्हणून भारतीय दंडविधानाची एक छोटी आवृत्तीही बाबारावांनी छापून घेतली होती. भावनेच्या आहारी जाऊन नव्हे, तर समजून उमजून तरुणांनी क्रांतीकार्याला हात घालावा, हा उद्देश यामागे होता ! लंडनहून स्वा. सावरकरांनी हातबाँब तयार करण्याचे तंत्र शिकवणारे कागदपत्र सेनापती बापट यांच्यामार्फत बाबारावांकडे पाठवले. बाबारावांनी हातबाँब तयार करण्याची ही कृती क्रांतीकारकांपर्यंत पोचवली. या कृतीवरूनच खुदिराम बोस यांनी न्यायाधीश किंग्जफोर्ड याच्या गाडीवर हिंदुस्थानात सिद्ध झालेला पहिला बाँब टाकला !

१ महिना सश्रम कारावास !

या सर्व व्यापांमुळे बाबारावांना अटक करण्याची संधी ब्रिटीश शासन शोधू लागले. ११ जून १९०८ रोजी शिवरामपंत परांजपे यांना पुण्यात अटक करण्यात आली आणि दुसर्‍याच दिवशी मुंबईला आणून त्यांच्यावर अभियोग सुरू करण्यात आला. स्वराज्य चळवळीसंबंधी परांजपे यांच्या ओघवत्या आणि परिणामकारक वक्‍तृत्वाने अनेक तरुण भारले होते. त्यामुळे परांजपे यांच्या अटकेने बाबारावांसहित अनेक तरुण प्रक्षुब्ध झाले. त्यांना काही मदत करावी या हेतूने बाबारावही मुंबईत आले. तेथील न्यायालयासमोर एका खोजा जमातीच्या व्यापार्‍याला पोलीस अधिकारी खूप त्रास देत असलेला बाबारावांनी पाहिला. बाबारावांचे तरुण रक्‍त उसळून आले. त्या व्यापार्‍यास पाठीशी घालून बाबारावांनी त्या पोलीस अधिकार्‍याशी वितंडवाद घालावयास सुरुवात केली. त्यामुळे चिडून पोलिसांनी बाबारावांनाच अटक केली. हे काय प्रकरण चालले आहे हे पाहण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी गायडर बाबारावांकडे आला आणि त्याने त्यांचे नाव विचारले. `बाबा सावरकर' हे नाव ऐकताच गायडरला अत्यानंद झाला. त्याने ताबडतोब बाबारावांची झडती घेतली तेव्हा त्यांच्याजवळ रशियन क्रांतीसंबंधीचे एक पत्रक सापडले. त्या पत्रकाच्या आधारे बाबारावांना एक महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. ती त्यांनी ठाणे आणि नाशिक येथील कारागृहांत आनंदाने भोगली.

जन्मठेपेची शिक्षा !

क्रांतीकारकांच्या अनेक गुप्‍त उद्योगांत बाबाराव सावरकरांचा हात आहे आणि त्यांना त्यांचे मार्गदर्शनही लाभले आहे, हे ब्रिटीश गुप्‍तहेर खात्याने ओळखले होते. १९०९ मध्ये बाबारावांनी कवी गोविंद रचित चार क्रांतीकारी कविता प्रसिद्ध केल्या. त्यांपैकी `रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले ?' या कवितेत प्रतिपादले होते की, गुलामगिरीत खितपत पडलेल्या जगातील कोणत्याही देशाला सशस्त्र क्रांतीशिवाय स्वातंत्र्य मिळाले नाही. मग त्याला हिंदुस्थानच कसा अपवाद असेल ? या कविता प्रसिद्ध केल्या म्हणून सरकारने बाबारावांना अटक करून जन्मठेपेची अतिशय कठोर शिक्षा दिली. ८ जून १९०९ रोजी बाबारावांना शिक्षा होऊन अंदमानात नेण्यात आले. त्या वेळी ते जेमतेम ३० वर्षांचे होते !

अंदमान

अंदमानातील `सेल्युलर जेल'मध्ये असतांना बाबारावांच्या शारीरिक यातनांना पारावार राहिला नाही. धोकादायक क्रांतीकारक म्हणून तेथील तुरुंगाधिकार्‍याने बाबारावांकडून अतिशय कष्टाची कामे करवून घेतली. तरीही बाबारावांच्या मनातील क्रांतीची भावना यत्किंचितही कमी न होता ती अधिकच धारदार झाली. संघटनचातुर्य आणि अन्यायाचा प्रतिकार हे त्यांच्या रोमरोमांत भिनले असल्यामुळे त्यांनी अंदमानातच कारावास भोगत असलेल्या स्वा. सावरकरांच्या साहाय्याने तेथील राजकीय कैद्यांना संघटित केले. चांगली वागणूक आणि अन्न मिळावे म्हणून उपोषण, असहकार, संप आदी मार्गांनी लढा दिला. परिणामी त्यांना अधिकाधिक कठोर शारीरिक शिक्षा भोगाव्या लागल्या; परंतु त्याची तमा न बाळगता बाबारावांनी आपले कार्य अविरत चालू ठेवले. अंदमानातील ११ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत त्यांची प्रकृती पार ढासळली आणि त्यांना क्षयाचा विकार जडला. ते अंदमानात असतांनाच त्यांची पत्‍नी सौ. येसूवहिनींनी या जगाचा निरोप घेतला. त्या दोघांची शेवटची भेटही मुजोर शासनाने होऊ दिली नाही. १९२१ मध्ये बाबारावांना हिंदुस्थानात परत आणण्यात आले आणि साबरमतीच्या कारागृहात ठेवण्यात आले. त्या वेळी त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. बाबाराव आता काही तासांचेच सोबती आहेत, असे शासनाच्या डॉक्टरने सांगितले तेव्हाच म्हणजे सप्टेंबर १९२२ मध्ये सरकारने त्यांची सुटका केली !

बाबारावांची ग्रंथसंपदा

बाबारावांनी अनेक पुस्तके लिहिली. `वीर बैरागी' या भाई परमानंदलिखित पुस्तकाचे त्यांनी भाषांतर केले. या पुस्तकात बंदा वीराचे चरित्र सांगून हिंदूंना स्फूर्ती द्यावी, सूड कसा उगवावा ते शिकवावे तसेच पंजाबातील शीख आणि मराठे यांचा दुवा जोडावा, हा बाबारावांचा उद्देश होता. या पुस्तकात औरंगजेबाच्या मुसलमानी सत्तेशी वीर बंदा बैराग्याने केलेल्या संघर्षाची कहाणी आहे. `राष्ट्रमीमांसा' या पुस्तकात त्यांनी `भारत हे हिंदुराष्ट्र आहे' हे सिद्ध केले आहे. `श्री शिवरायांची आग्र्‍यावरील गरुडझेप' या पुस्तकात आग्र्‍याला जाण्यात शिवरायांचा हेतू औरंगजेबाचा वध करण्याचा होता, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. `वीरा-रत्‍नमंजुषा' या पुस्तकात महाराणी पुष्पवती, राजा दाहिरच्या दोन वीरकन्या, राणी पद्मिनी, पन्नादायी आदी रजपूत स्त्रियांची चरित्रे वर्णिलेली आहेत. `हिंदुराष्ट्र - पूर्वी, आता नि पुढे', `धर्म हवा कशाला ?', `ख्रिस्तास परिचय अर्थात् ख्रिस्ताचे हिंदुत्व' ही त्यांची अन्य पुस्तके आहेत.

बाबाराव आणि रा. स्व. संघ

संघाचा भगवा ध्वज डॉ. हेडगेवार यांनी बाबारावांकडून करवून घेतला. संघाची प्रतिज्ञाही बाबांनीच सिद्ध केली. त्यात थोडेफार शाब्दिक फेरफार करून डॉ. हेडगेवार यांनी ती स्वीकृत केली. बाबारावांनी स्थापन करून वाढवलेली `तरुण हिंदु महासभा' ही संघटना १९३१ मध्ये त्यांनीच संघात विलीन केली. संघाच्या सेनेत शिलेदारांची, म्होरक्यांची भरती करत असतांना बाबांनी संघाला अखिल भारतीय पाठिंबा मिळावा म्हणून अविश्रांत परिश्रम केले.

अखेरपर्यंत हिंदुराष्ट्राची चिंता

बाबारावांनी अखेरपर्यंत हिंदुराष्ट्राचीच चिंता वाहिली. बाबारावांच्या शेवटच्या दिवसांत चित्रमहर्षी भालजी पेंढारकर त्यांना भेटायला गेले असता त्यांनी भालजींना विचारले, ``माझ्या या हिंदुराष्ट्राचे कधीतरी पुनरुत्थान होईल काय ?'' भालजींनी उत्तर दिले, ``बाबा, हा महाराष्ट्र व हिंदु धर्म पुरातन, सनातन आहे. यानंतर खूप धर्म, राष्ट्रे जन्माला आली नि गेली. त्यामुळे या हिंदुराष्ट्राचे पुनरुत्थान नक्की होईल, यात मला शंका नाही !''

आयुष्यभर देशहितासाठी प्राणपणाने झटणारा हा वीरात्मा १६ मार्च १९४५ रोजी सांगली येथे कालवश झाला. बाबारावांचे चरित्र म्हणजे राष्ट्रासाठी चंदनाप्रमाणे अखंड झिजलेल्या एका थोर देशभक्‍ताची स्फूर्तीदायी कथा आहे !