
लेखक : श्री. अरविंद
विठ्ठल कुळकर्णी,
ज्येष्ठ पत्रकार,
मुंबई.
राहुल गांधींची मुसलमानधार्जिणी विधाने
आपण जवाहरलाल नेहरूंचे पणतू आहोत म्हणून आपणास भारताचे पंतप्रधान होण्याचा वंशपरंपरागत हक्क आहे, असे जे मानतात त्या राजीवपुत्र राहुल गांधी यांनी अलीकडे केलेली दोन विधाने हिंदूंनी संदर्भासहित स्पष्टपणे समजून घेतली पाहिजेत. `जर नेहरू घराण्यातील व्यक्ती पंतप्रधानपद धारण करून असती, तर बाबरी मशीद पडली नसती', असे एक उन्मत्त विधान राहुल गांधी यांनी लिबरहान आयोगाच्या बाबरी मशीद प्रकरणावरील प्रतिवृत्ताच्या संदर्भात हिंदूंच्या तोंडावर फेकले आहे. `भारताचा पंतप्रधान मुसलमान असू शकतो', असे दुसरे विधान त्यांनी एका मुसलमान संमेलनात केले आहे. वास्तविक पहिले विधान केल्यानंतर दुसरे विधान करण्याची काही आवश्यकता नव्हती. तथापि या दोन विधानात काँग्रेसच्या तत्त्वज्ञानाचा गाभा पुष्कळसा समाविष्ट होत असल्याने हिंदूंनी तो वरखाली करून नीट पारखून घेतला पाहिजे.मोतीलालजींचे पुत्रप्रेम
जरी स्वातंत्र्य आंदोलनात मोतीलाल नेहरू (१८६१-१९३१) आघाडीवर होते, तरी नेहरू घराणे ओळखले जाते ते त्यांचे पुत्र जवाहरलाल यांच्या नावाने. बी.आर्. नंदा यांचे `दि नेहरूज' नावाचे छानसे पुस्तक आहे. त्यात मोतीलाल आणि जवाहरलाल यांची बरीच माहिती आहे. पुस्तकाचा शेवट मोहनदास करमचंद गांधी यांच्या उद्गारांनी केला आहे. `मोतीलालजींच्या व्यक्एतीमत्त्वाचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य कोणते', असा प्रश्न गांधींना विचारला असता त्यांनी, ``त्यांच्या चिरंजिवावरचे त्यांचे प्रेम'' असे उत्तर दिले. `भारतावरचे प्रेम नाही का ?', असा प्रतिप्रश्न केला असता गांधी म्हणाले, ``मोतीलालजींचे भारतावरचे प्रेम त्यांच्या पुत्रप्रेमातून निर्माण झाले आहे.''
सावरकर परंपरा आणि नेहरू परंपरा
हे पुत्रप्रेम भारताला फारच महागात पडले आहे. तिन्ही सावरकर बंधूंनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अनन्वित यातना सहन केल्या. `तीनच काय पण सात भाऊ असते, तरी देशासाठी अर्पण केले असते', असे एका कवितेत सावरकरांनी म्हटले आहे. त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली तेव्हा नाशिकच्या न्यायालयातच `पहिला हप्ता' नावाच्या केलेल्या कवितेत आपली जन्मठेप म्हणजे मातृभूमीची केलेली अल्पस्वल्प सेवा आहे आणि ती गोड मानून घ्यावी, असे अत्यंत नम्रपणे त्यांनी म्हटले आहे. सावरकरी परंपरा असे मानते की, आपले राष्ट्र म्हणजे जननी स्वरूप आहे आणि तिच्या सुखासाठी सर्वोच्च पराक्रम आणि त्याग करणे हे प्रत्येक भारतियाचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य त्याने निरपेक्षपणे आणि आनंदाने केले पाहिजे. म्हणजे आपल्या सेवेची परतफेड म्हणून त्याने देशाकडे काही मागता कामा नये. त्याच्या उलट नेहरू परंपरेचे आहे. देशाची जी थोडीबहुत सेवा आपल्या हातून होईल त्याची पुरेपूर किंमत वसूल करण्यावर नेहरू परंपरा विश्वास ठेवते.
सावरकरांची भेटही न घेणारे नेहरू
त्यामुळे नेहरू घराण्याने देशासाठी नेमके काय केले आणि त्याप्रीत्यर्थ देशाकडून त्यांनी काय उपटले याचा ताळेबंद एकदा मांडला पाहिजे. स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतल्यामुळे मोतीलालना जेव्हा किरकोळ कारावास भोगावा लागत असे, तेव्हा बाहेर ज्या विलासात ते जीवन जगत त्या सर्व सुखसोयी आतमध्ये त्यांचेसाठी उपलब्ध करून दिल्या जात असत. कारण ब्रिटीश राज्यकर्त्यांशी त्यांचे संबंध मित्रत्वाचे होते. आपला एकुलता एक मुलगा जवाहरलाल संस्काराने पक्का इंग्रज व्हावा, अशी त्यांची इच्छा होती आणि कोवळया वयातच त्यांनी जवाहरला शिकायला लंडनला पाठविले होते. तेथे त्याचे जे स्थानिक ब्रिटिश पालक होते, ते जवाहरला भारतातील स्वातंत्र्य चळवळीचा वाराही लागणार नाही याची काळजी घेत. तेथे जवाहर भारतीय विद्यार्थ्यात कधी मिसळत नसे. त्याचवेळी सावरकरही शिष्यवृत्तीवर लंडनमध्ये शिकत होते. ते नुसते शिकत नव्हते, तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अत्यंत तेजस्वी पर्वाचे सूत्रसंचालन स्वत: करीत होते. पण सावरकरांची भेट घ्यावी, असे नेहरूंना कधी वाटले नाही. ब्रिटनच्या हेर खात्याचा प्रमुख कर्झन वायली यास बाबाराव सावरकरांच्या जन्मठेपेचा प्रतिशोध म्हणून मदनलाल धिंग्राने यमसदनास पाठविले. त्यानंतर देशभक्तीचे जे चैतन्यदायी वातावरण लंडनमधील भारतीय विद्यार्थ्यात संचारले त्याने बहुधा प्रभावित होऊन चर्चिल असे म्हणाला की, पुढचा दोन सहस्र वर्षे तरी मदनलालची स्मृती पुसली जाणे शक्य नाही; पण नेहरू प्रयत्नपूर्वक त्या मदनलाल पर्वापासून दूर राहिले. इतके की नंतर पुष्कळ वर्षांनी लिहिलेल्या आत्मचरित्रात मदनलालचा उल्लेखही करावे नेहरूंना सुचले नाही.
नेहरूंची भारतमातेशी प्रतारणा
मुसलमानांनी पाकिस्तानकरिता दंगे चालू केले, तेव्हा ते मोडून काढणे नेहरूंना जमले नाही. सावरकरी संप्रदायापासून दूर रहाण्यात इतिकर्तव्यता मानल्याने मुसलमानांचे दंगे कसे मोडून काढायचे असतात ते कळण्यात ते कमी पडले. पाकिस्तानला मान्यता देण्यावाचून त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ``आम्ही दमलो होतो, म्हणून विभाजन स्वीकारले'', असे नेहरूंचे उद्गार आहेत. खरे म्हणजे त्यांना सत्ता संपादनाची घाई झाली होती. पंतप्रधान होताच नेहरूंनी खंडित भारतातील `मुस्लीम लीग ही देशभक्तांची संघटना आहे', असे प्रशस्तिपत्र देऊन टाकले. त्यांनी सोरटी सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास विरोध केला. निझामाला हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावयाचे नव्हते. पाकिस्तानात सामील होण्याचा आटापिटा तो करीत होता. तरीदेखील त्याच्यावर काही कारवाई करू नये, असे नेहरू पटेलांना सांगत होते. पाकिस्तानने काश्मीर बळकावण्यासाठी भारतावर ससैन्य आक्रमण केले, तेव्हा नेहरूंनी सर्वप्रथम काश्मीरची सूत्रे हरिसिंग महाराजांकडून काढून घेतली आणि ती शेख अब्दुल्लाकडे सोपवली. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याशी लढण्याकरिता त्यांनी भारताचे सैन्य पाठवले; पण त्याला सहज शक्य असूनही काश्मीर पूर्ण मुक्त करू दिला नाही. जवळजवळ निम्मा काश्मीर त्यांनी पाकिस्तानला भेट म्हणून दिला आणि निम्मा शेख अब्दुल्लाच्या पदरात टाकला. शेख अब्दुल्लाला मोकळे रान देण्यासाठी त्यांनी महाराजा हरिसिंग यांना काश्मिरातून हुसकावून लावलेच; पण एकंदरीत सर्व हिंदूंना काश्मिरात रहावयाचे असेल, तर ते मुसलमानांच्या सौजन्याशी जुळवून घेऊनच रहाता येईल, असे संकेत दिले. चीनने तिबेट गिळंकृत केला त्याचा यांना आनंद झाला. स्वत:च्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेचा यांना इतका गर्व होता की, `भारताला संरक्षणासाठी सैन्याची आवश्यकता नाही', असे प्रलाप त्यांच्या तोंडून बाहेर पडले. चीनने आक्रमण करून यांना धडा शिकविला आणि ३६ सहस्र चौ. कि.मी. प्रदेश घशाखाली घातला. तरी आपण सत्तात्याग करावा आणि प्रायश्चित्त घ्यावे, असे यांना वाटले नाही. सत्ता मिळताच यांनी पाकिस्तानचा पंतप्रधान लियाकत अली याला भारतात बोलावून घेतले आणि दोघांनी एकमेकांच्या अंतर्गत गोष्टीत लक्ष घालायचे नाही, अशी संधी केली. त्याचा इतका दुष्परिणाम झाला की, पाकिस्तानात शासनाकडून हिंदूंचा होणारा छळ आपण बघत होतो; पण तो छळ थांबवावा म्हणून आपण काही करू शकत नव्हतो, असे पाकिस्तानातील भारताचे पहिले उच्चायुक्त श्रीप्रकाश यांनी लिहून ठेवले आहे. मदनलाल पर्वाचा नेहरूंनी इतका धसका घेतला होता की, लियाकत अलींना प्रसन्न करण्यासाठी ते आले, तेव्हा त्यांनी सावरकरांना काही काळ कारावासात डांबले होते. जी धोरणे ब्रिटिशांची तीच नेहरूंची होती. आपल्या राज्याचा सर्वात मोठा शत्रू सावरकर असेच दोघेही मानीत होते आणि दोघांनाही मुस्लीम लीग अत्यंत जवळची होती. आपल्यामागून इंदिरा गांधी पंतप्रधान व्हाव्यात म्हणून नेहरूंनी दबावतंत्राचा भरपूर वापर केला.
नेहरूंनी भारत हा हिंदुबहुल देश असल्याचे न सांगणे
बाबरी मशीद पडली तेव्हा मध्यपूर्वेतील एका सुलतानाने तेथील भारतीय राजदूताला बोलावून त्या आंदोलनाची पार्श्वभूमी समाजावून घेतली. भारत हा हिंदुबहुल देश आहे, हे ऐकून त्याला धक्का बसला. जगाला भारताची ओळख नेहरूंनी करून दिली आणि त्यांनी भारत हा हिंदुबहुल देश आहे, हे कधीही सांगितले नाही, असे उद्गार त्या सुलतानाने काढले.
बाबरी मशीद पडल्याचा हिंदूंना आनंद
तात्पर्य हे की नेहरूंनी मुसलमानांना पाकिस्तान दिले आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी मुसलमानांचे हितसंबंध जपण्यासाठी राज्ययंत्रणा वापरली. `हिंदू हे अपराधी आहेत आणि त्यांच्याकडून मुसलमानांवर अन्याय होतो' अशा समजाने ते पछाडलेले होते. राहुल गांधी म्हणतात ते खरे आहे की, नेहरू घराण्यातील व्यक्तीने बाबरी मशीद पाडू दिली नसती; पण त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, बाबरी मशीद पडली तेव्हा खरे म्हणजे सर्व हिंदूंना आनंद झाला. असे हिंदुत्वाचे विरोधक माधव गडकरी यांनीही लिहून ठेवले आहे. हिंदूंचा नेहरू घराण्यावर विश्वास राहिला आहे, असे ठामपणे म्हणता येणार नाही. हिंदुत्वनिष्ठ संघटित नाहीत आणि हिंदुत्व ते ठामपणे मांडत नाहीत; म्हणून लोक काँग्रेसला मत देतात एव्हढेच. हिंदूंनी जर मुसलमानांशी त्यांना समजेल अशा भाषेत सुसंवाद केला, तर नेहरू घराणे सर्वसामान्य मुसलमानांचीही कशी फसवणूक करते आहे, हे त्यांना पटवून देता येईल. बाबरी मशीद पडली तेव्हा नेहरू घराणे भारतावर राज्य करीत नव्हते, याकारिता हिंदूंनी नियतीचे आभार मानले पाहिजेत. त्यानिमित्ताने तरी नेहरूंचा नियतीशी संबंध जोडता येईल.
सौजन्य -: सनातन प्रभात